धक्कादायक ! दुसऱ्या पत्नीशी वादानंतर पित्याने 4 वर्षाच्या मुलाला आपटून आपटून केले ठार; घटना सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबई – दुसऱ्या पत्नीशी वाद झाल्यामुळे पित्याने आपल्या 4 वर्षीय मुलाची आपटून आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सानपाडा रेल्वे स्थानकावर सोमवारी घडली. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 3 वर दुसऱ्या पत्नीशी झालेल्या वादानंतर पित्याने 4 वर्षीय मुलाची हत्या केली. आरोपीला वाशी जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. सकलसिंग पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी यवतमाळ येथील भटक्या कुटुंबातील असून सानपाडा पुलाखाली राहत होता. भीक मागून उदरनिर्वाह करत होता.

आरोपी सकलसिंह पवार आणि पत्नीचे नेहमी वाद होत होते. त्यादिवशी भांडण करत असताना रेल्वे स्थानकावर पोहचले. यावेळी फलाटावर सर्व जण एकत्र चालत असताना, सकलसिंग पवार याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादातून त्याने स्वतःचा चार वर्षांचा मुलगा प्रशांत याला उचलून फलाटावर आपटले. यावेळी तेथे उपस्थित व्यक्तींनी त्याला अडविण्याचाही प्रयत्न केला, परंतु तो सतत मुलाला उचलून जोराने खाली फेकत होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत मुलगा हा त्याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता.

त्याची पहिली पत्नी गावी राहते. तो सध्या दुसरी पत्नी मेहेर हिच्यासोबत नवी मुंबईत सानपाडामध्ये राहत आहे. रविवारी रात्रीपासून सकलसिंग याचा दुसरी पत्नी मेहेर हिच्यासोबत वाद सुरू होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.