“माथाडी’च्या नावाखाली व्यावसायिकाकडे खंडणी

गजानन मारणे टोळीतील सराईतासह चौघे जेरबंद

पुणे – हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी गजानन मारणे याच्या टोळीतील सराईतासह चौघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने जेरबंद केले. सव्वादोन महिणे हे आरोपी हॉटेल व्यावसायिकाला धमकावत होते. मागील वर्षभरात माथाडी संघटनेच्या नावाने खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणाची पोलीस आयुक्‍तांनी गांभीर्याने दखल घेतल्यावर गुन्हे दाखल करून अनेकांना जेरबंद केले आहे.

ओम तिर्थराम धर्मजिज्ञासु (30, रा. कोथरुड), ललीत मारुती काकडे (28, रा. राजयोग सोसायटी, वारजे माळवाडी), महेश कालिदास परीट (19, रा. जयभवानीनगर, कोथरूड), योगेश प्रकाश कानगुडे (24, रा. सुतारदर, कोथरुड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कुमार राजेंद्र झेंडे (27, रा. भेकराईनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचे करिश्‍मा सोसायटीमध्ये 95 पास्ता ऍन्ड पिझ्झा आणि ब्रु रुम कॅफे नावाचे स्नॅक सेंटर आहे. जून महिन्यामध्ये त्यांच्या 95 पास्ता ऍन्ड पिझ्झा दुकानाच्या फर्निचरचे काम सुरू होते. तेव्हा योगेश कानगुडेने तेथे येऊन माथाडी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगत स्वत:चे व्हिजिटींग कार्ड आणि ओम धर्मजिज्ञासु व स्वत:च्या नावाचे लेटर हेड दिले. तसेच “तुम्ही तुमच्या दुकानात जो माल उतरवता, त्यासाठी आमचे हमाल वापरत नाही. त्या बदल्यात तुम्हाला आम्हाला पैसे द्यावे लागतील’ असे सांगितले. तेव्हा फिर्यादीने त्यांना “माझ्या कामाची तसेच लग्नाची गडबड सुरू असल्याने पैसे देऊ शकत नाही, आपण नंतर बघू’ असे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही आरोपी वारंवार फोन करून तसेच प्रत्यक्षात भेटून त्यांना “पैसे द्या नाहीतर बघून घेऊ’ असे धमकावत होते. दरम्यान, फिर्यादीची दोन्ही हॉटेल सुरू झाल्यावर आरोपींनी तेथे दाखल होत. “आम्हाला दर महिना 18 हजारचा हप्ता द्यावा लागेल, आम्ही महाराजांची माणसे आहोत, तुला खल्लास करू आणि हॉटेल चालू देणार नाही’, अशी धमकी दिली. फिर्यादीने अखेर या धमकी व त्रासाला कंटाळून तक्रार दाखल केली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्‍त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्‍त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, संजय गायकवाड, राजकुमार केंद्रे व पोलीस कर्मचारी अनिल शिंदे, रामदास गोणते, संदीप तळेकर, दत्तात्रय गरुड, संदिप राठोड, प्रविण तापकीर, संतोष क्षिरसागर, गजानन गानबोटे, सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपी ओम धर्मजिज्ञासू याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात सन 2009 मध्ये खुनाचा, सन 2015 मध्ये दुखापतीचा, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सन 2017 मध्ये पिस्तोलजवळ बाळगल्याचा असे 3 गुन्हे दाखल आहेत. ओम हा माथाडी कामगार संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष व ललीत काकडे हा उपाध्यक्ष म्हणून काम करत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

“नागरिकांनो, खंडणी मागणाऱ्यांची माहिती द्या’
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी व्यापारी, हॉटेल व मॉलचे मालक व चालक यांना माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली खंडणी मागीतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. आरोपींनी या प्रकारे कोणाला खंडणी मागितली असल्यास गुन्हे शाखा युनिट तीनच्या 9420015718 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. आरोपी ओम धर्मजिज्ञासू व योगेश कानगुडे, ललीत काकडे व महेश परीट वेगवेगळ्या वेळी फिर्यादीला खंडणी मागण्यासाठी येत होते. ओम हा तथाकथित माथाडी संघटनेचा अध्यक्ष तर ललीत काकडे हा उपाध्यक्ष आहे. दोघांनाही फिर्यादीकडे खंडणी मागताना एकमेकांना माहिती दिली नव्हती. फिर्यादीला योगेशने स्वत:चे व ओमचे नाव असलेले लेटरहेड तर महेशने स्वत:चे व ललितचे नाव असलेले लेटरहेड दिले होते. फिर्यादीने ही बाब ओमच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांनी आपापसात चर्चा करून 18 हजार रुपये प्रति महिना खंडणी देण्याची मागणी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here