प्रगतीशील महाराष्ट्राचा गतिमान नेता

‘जे जनतेला हवे तेच आम्हाला करायचे आहे. विवेकबुद्धी जागी ठेवून जनकल्याणाचे कार्यक्रम हाती घेत आणि त्यांच्या पूर्णत्वासाठी राजकीय इच्छाशक्‍ती ठेवून निर्धाराने वाटचाल सुरू आहे’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या उद्‌गारातच त्यांच्यातील प्रत्येक गुणाचे दर्शन होते. जनकल्याणासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि त्याची पूर्तता करण्यासाठी विवेकबुद्धी आणि निर्धाराचे बळ या विशेषणांत देवेंद्रजींचे व्यक्‍तिमत्त्व सामावलेले आहे. महाराष्ट्रातील 11 कोटी जनता देवेंद्रजींच्या या गुणांच्या प्रेमात आहे, असे म्हणता येईल.

देवेंद्रजींशी माझा परिचय आणि संपर्क भारतीय जनता युवा मोर्चाचे काम करतानाच आला. नागपूरचा सर्वात तरुण महापौर, विरोधी बाकांवरील सर्वात अभ्यासू आमदार ही देवेंद्रजींची वैशिष्ट्ये माझ्यासारखा तरुण प्रारंभापासूनच अनुभवत होता आणि त्यामुळेच देवेंद्रजी महाराष्ट्राचे भवितव्य आहेत याबद्दल मनात विश्‍वास होता. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर त्याचे नेतृत्व देवेंद्रजींकडे येणे हा योगायोग नव्हता तर ते त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे लाभले. माझ्यासारख्या महाराष्ट्रभरातील तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याचे आणि कार्य करण्याची प्रेरणा देण्याचे काम देवेंद्रजींनी केले. पुण्यासारख्या शहरात भारतीय जनता पक्षाच्या हातात प्रथमच सत्ता आल्यानंतर त्यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ माझ्या गळ्यात घातली. मोठ्या शहराचे आर्थिक नियोजनाची जबाबदारी देवेंद्रजींनी सांभाळलेली असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करता आले. पुण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय देवेंद्रजींनीच घेतलेले आहेत, ते घेत असताना आम्हाला विश्‍वासात घेणे, आमची मते समजावून घेणे यालाही त्यांनी तेवढेच महत्त्व दिले. कर्वे रस्त्यावर मेट्रोच्याबरोबर दुहेरी उड्डाणपूल व्हावा, ही योजना मी मांडल्यावर देवेंद्रजींनी ती जाणून तर घेतलीच; पण त्याचबरोबर ती मार्गी लागण्यासाठीची सारी मदत केली. उद्या कर्वे रस्त्यावर साकारणारा उड्डाणपूल ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाचे यश आहे. आपल्या निर्णयप्रक्रियेत आपल्या सहकार्यांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीचे यश आहे.

तरूण, तडफदार, अभ्यासू, तंत्रज्ञानस्नेही, उद्योग आणि शेतीविषयक सारखीच जाण, तरुणांशी नाते साधण्याची क्षमता ही देवेंद्रजींच्या व्यक्‍तिमत्त्वाची आणखी काही वैशिष्ट्ये. महाराष्ट्रातील शहरांना सुस्थितीत आणण्यासाठी पायाभूत सुविधा, शेती व शेतकऱ्याला भरभक्‍कम पाठबळ यासाठी गतिमान निर्णय घेत देवेंद्रजींनी महाराष्ट्राची विस्कटलेली घडी नव्याने बसविलेली आहे. संपन्न, समृद्ध आणि भ्रष्टाचारमुक्‍त महाराष्ट्राचा संकल्प करीत महाराष्ट्राच्या विकासपर्वाचा प्रारंभ देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झाला असे अभिमानाने म्हणता येईल. शहरे ही विकासाची आणि प्रगतीची इंजिने असतात, तेथील पायाभूत सुविधा बळकट करण्याचा पहिला ठोस प्रयत्न मोदी सरकारने सुरू केला. महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे आणि प्रगतीचे इंजिन आहे, येथील शहरीकरण देशात सर्वाधिक आहे, याची अचूक जाण ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी निश्‍चित दिशेने प्रयत्न सुरू केले. महाराष्ट्राच्या शहरीकरणाच्या सुनियोजित विकासाचा भाग्यविधाता असे देवेंद्रजींच्याबाबतीत निश्‍चितपणाने म्हणता येईल. ज्या ज्या देशात शहरीकरणाचे आव्हान पेलले गेले आहे, आणि तेथील सुधारणा झपाट्याने केल्या गेल्यात ते देश आर्थिक आघाडीवर यशस्वी झालेले पाहतांना दिसतात. यातले मर्म ओळखून त्या मार्गावर महाराष्ट्राला नेण्याचे काम देवेंद्रजींनी केलेले आहे. भारताच्या 15 टक्‍के जीडीपीचे योगदान हे महाराष्ट्राचे आहे, देशातील 53 टक्‍के परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येते, या धर्तीवर मुंबई, पुणे व अन्य शहरे नागरी सुविधा पुरवण्यासाठी सक्षम करणे, तेथील वाहतूक व्यवस्था मार्गी लावण्यासाठी देवेंद्रजींनी गतिमान प्रयत्न केले.

महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचे देवेंद्रजींचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी शहरांची भूमिका कळीची राहणार आहे. याचे पूर्ण भान असल्याने देवेंद्रजींनी शहरांच्या विकासावार नुसते लक्ष केंद्रित केलेले नाही, तर त्यासाठी पक्षाच्या महापालिकातील पदाधिकाऱ्यांना सक्षम बनविणे. त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना विश्‍वासाने सहभागी करून घेण्यावर देवेंद्रजींचा भर आहे. देवेंद्रजीच्या प्रेरणादायक नेतृत्वामुळे महाराष्ट्र आणखी प्रगतीशील होणार आहे असा विश्‍वास शहरी नागरिकांच्या मनात निर्माण करण्यात ते यशस्वी झालेले आहे. विचार करणे, धोरण आखणे, निर्णय घेणे आणि निर्णयाची अंमलबजावणी वेगाने करणे हे देवेंद्रजींच्या कारभाराचे सूत्र आहे. यामुळेच महाराष्ट्राने गती घेतलेली आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणाऱ्या देवेंद्रजींना उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभावे हीच परमेश्‍वरचरणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना.

– मुरलीधर मोहोळ (मा. अध्यक्ष स्थायी समिती, नगरसेवक, पुणे महानगरपालिका)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)