मुंबई : रायगड पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये सुंदोपसुंदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळापासून सुरू होती. आता पालकमंत्रिपद जाहीर झाल्यानंतर रायगडमध्ये राडा झाला आहे. शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले रायगड पालकमंत्रिपदासाठी आग्रही असताना राष्ट्रवादीच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. यामुळे शनिवारी मध्यरात्री शिंदेसेनेचे शिवसैनिक संतप्त झाले.
संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून रस्त्यावर टायर जाळण्यात आले. यामुळे शिंदेसेनेची नाराजी जाहीर होत असून महायुतीत वाद वाढण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेच्या शिवसैनिकांनी गोगावलेंचा जयघोष करत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंचा निषेध केला. गोगावले समर्थक कार्यकर्त्यांनी जवळपास दोन तास रस्ता रोखून धरला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत रस्ता मोकळा केला. शिवसैनिकांना बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. अजूनही या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
दरम्यान, भरत गोगावले हे पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. मागील कार्यकाळात त्यांना मंत्रिपद दिले जाईल असे सांगितले गेले. मात्र महायुती सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला, पण गोगावलेंना मंत्रिपद मिळाले नाही. अखेर सरकारचा कार्यकाळ संपत असताना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली होती.
महायुती सरकारच्या दुस-या कार्यकाळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. आता रायगडचे पालकमंत्रिपद मिळेल असा विश्वास त्यांना होता. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्या पदरात पालकमंत्रिपद पडले. महायुतीतील मित्रपक्षांनी पाठीत खंजीर खुपसल्याच्या संतप्त भावना शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहेत.