बंगळूर – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी पक्षाचे राजस्थानमधील बंडखोर नेते सचिन पायलट यांच्याशी समेट करण्याची भूमिका घेतली आहे. तसेच, राजस्थानमधील राजकीय पेचावर सन्मानजनक तोडगा काढण्याचे आर्जव स्वपक्षाला केले आहे.
पायलट यांच्या बंडामुळे राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार अडचणीत आले आहे. त्या बंडानंतर कॉंग्रेसने पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदांवरून हकालपट्टी केली.
त्या पार्श्वभूमीवर, पीटीआय वृत्तसंस्थेला खुर्शिद यांनी मुलाखत दिली. कॉंग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट माझे जवळचे मित्र होते. त्यांचे पुत्र म्हणून सचिन पायलट यांना मी लहानपासून ओळखतो. त्यामुळे आणि कॉंग्रेसचा सदस्य म्हणून मला राजस्थानमधील घडामोडी व्यथित करतात, असे खुर्शिद यांनी म्हटले.
कॉंग्रेसने पायलट यांच्यापर्यंत पोहचावे का, या प्रश्नावर ते उत्तरले, कॉंग्रेसमध्ये येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला पक्षात आणण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. पक्ष एकत्र ठेवण्याच्या प्रयत्नांची गरज मला वाटते. अर्थात, कुठल्याही नेतृत्वाकडून महत्वाकांक्षेला थारा देण्याच्याही मर्यादा आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.