मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या निर्णयानुसार सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी करण्यात आला आहे. याबाबत काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अधिसूचना जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असल्याचे दिसत आहे.
राज्य सरकारच्या सीएनजीवरील कर कमी करण्याच्या निर्णयाचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा असून सीएनजीचे कमी झालेले नवे दर १ एप्रिल २०२२ पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला होता राज्य सरकारने आरोग्य, शेती, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच, सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता सीएनजी आणि पीएनजी स्वस्त: होणार आहे.