50 टक्के फेऱ्या घटल्या : रात्री मिळतोय प्रतिसाद
पुणे – शहरातील वाढत्या तापमानाचा फटका महापालिकेच्या सायकल शेअरिंग योजनेला बसला आहे. गेल्या महिनाभरात सायकल फेऱ्यांची संख्या 50 टक्के घटली असल्याची माहिती महापालिकेच्या सायकल विभागाकडून देण्यात आली. तर तापमानाचा पारा घसल्यानंतर रात्री 9 पासून पुढे काही प्रमाणात सायकल वापरल्या जात असल्याचेही सांगण्यात आले.
यंदा एप्रिल महिन्यापासूनच सूर्यनारायण कोपला असून शहरातील तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. त्यामुळे अनेकदा दिवसभर मोठा प्रमाणात उकाडा जाणवत असून सकाळी आठपासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून घराबाहेर पडण्यासाठी प्रवासी बस तसेच खासगी वाहनांचा वापर केला जात आहे. महापालिकेने मागील वर्षी शहरातही सार्वजनिक सायकल योजना सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार वर्ग तसेच नागरिकांकडून जवळच्या कामासाठी सायकल वापरल्या जात होत्या.
त्यामुळे पालिकेकडून शहरात उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुमारे चार हजार सायकलींच्या सरासरी आठ ते दहा फेऱ्या नोंदविल्या जात होत्या. मात्र, गेल्या महिनाभरात हा आकडा 3 ते 4 फेऱ्या प्रतिदिन आला असल्याचे सायकल विभागाचे प्रमुख नरेंद्र साळुंखे यांनी स्पष्ट केले. प्रामुख्याने उन्हामुळे हा वापर कमी झाल्याचे चित्र असून रात्री तापमान घटल्यानंतर या फेऱ्यांची संख्या 5 च्या आसपास जात असल्याचे साळुंखे यांनी स्पष्ट केले.