Hingoli News – साखरा तांडा येथे गावातील पिसाळलेले श्वान पडलेल्या विहीरीतील पाणी पिल्यामुळे घाबरलेल्या गावकऱ्यांचे आरोग्य विभागाने लसीकरण सुरु केले आहे. आज सकाळी १४७ गावकऱ्यांना अँन्टी रेबीजचा दुसरा डोस देण्यात आला आहे. यावेळी आरोग्य विभागाने गावकऱ्यांचे समुपदेशन केले.
साखरा तांडा येथे शनिवारी ता. १८ दुपारी गावातील पिसाळलेले श्वान विहीरीच्या पाण्यावर मृतावस्थेत तरंगतांना दिसून आला. विशेष म्हणजेे शुक्रवार व शनिवारी या दोन दिवस गावातील अनेकांनी या विहीरीचे पाणी पिले होते. त्यामुळे गावकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकाराची माहिती आरोग्य विभागाला मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीष रुणवाल यांनी तातडीने गावात लसीकरण शिबीर घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार साखरा तांडा गावात शनिवारी ता. १८ सायंकाळी १४७ गावकऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यासाठी हिंगोली व कापडसिंगी आरोग्य केंद्रातून लस उपलब्ध करण्यात आली.
त्यानंतर आज सकाळी नऊ वाजल्यापासून दुसरा डोस देण्यास सुरवात झाली. सकाळी साडेआकरा वाजता सर्व १४७ जणांना अँन्टी रेबीज डोस देण्यात आला. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. गजानन कदम, डॉ. मयुर नागरे, आरोग्य कर्मचारी जमुना कळासरे, प्रिती धबडगे, नंदा ढवळे, राजु देवकते, दिलीप हाके यांनी लसीकरणासाठी पुढाकार घेतला. आता शनिवारी ता. २५ तिसरा डोस दिला जणार आहे.