निविदेबाबत संशय; फेरनिविदेची तसदी नाही
एकच निविदा आल्याने अर्थपूर्ण लागेबांधे उघड
14 कोटींचे काम 16 कोटींवर पोहोचले
पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवड येथील एम्पायर इस्टेटसमोरील उड्डाणपुलाला चिंचवडच्या बाजुने चढण्या-उतरण्यासाठी महापालिकेतर्फे रॅम्प बांधण्यात येणार आहे. तब्बल 14 कोटींच्या या कामासाठी केवळ एकाच ठेकेदाराने निविदा सादर करूनही महापालिकेने निकोप स्पर्धेसाठी फेरनिविदा मागविण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे महापालिका पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील अर्थपूर्ण लागेबांधे पुन्हा एकदा उघड झाले आहेत. विशेष म्हणजे या कामासाठी फेरनिविदा न मागविण्यात आल्यामुळे पालिकेला ठेकेदाराला 2 कोटी अधिकचे मोजावे लागणार आहेत. मूळ निविदेतील 14 कोटी कामांचा खर्च आता 16 कोटींपर्यत पोहोचला आहे
पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे चिंचवड येथील एम्पायर इस्टेटलगत उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलाला चिंचवडच्या बाजुने चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बांधण्याचे महापालिकेचे प्रयोजन आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागातर्फे निविदा मागविण्यात आल्या. महापालिकेतर्फे या कामासाठी 13 कोटी 99 लाख 57 हजार 668 रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. निविदा सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत केवळ मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांचीच निविदा सादर झाली होती. त्यांनी या कामासाठी 15 कोटी 80 लाख 55 हजार 546 रुपयांची निविदा सादर केली होती.
त्यांच्या व्यतिरिक्त कुणाचीही निविदा प्राप्त न झाल्यामुळे 15 मे, 21 जून आणि 28 जून रोजी दिलेल्या पत्राद्वारे त्यांना हे दर कमी करण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानुसार त्यांनी 15 कोटी 48 लाख 50 हजार रुपये इतका सुधारीत दर सादर केला. महाराष्ट्र शासनाच्या सन 2018-19 च्या दरसुचीनुसार टेस्टींग चार्जेस, आरसीसी डिझाईन चार्जेस, सिमेंट व स्टिल फरक आणि रॉयल्टी चार्जेससह या कामाची किंमत 16 कोटी 20 लाख 47 हजार 722 रुपये 25 पैसे इतकी येते.
यामध्ये जीएसटीचा समावेश नाही.ही निविदा सादर केल्यानंतर प्रशासनाने पुन्हा ठेकेदाराला दर कमी करण्यासाठी सांगितले तेव्हा ठेकेदाराने सुधारीत दर 15 कोटी 48 लाख 50 हजार रुपये सादर केला मात्र तरीही या कामासाठी फेरनिविदा न मागविण्यात आल्यामुळे पालिकेला ठेकेदाराला 2 कोटी अधिकचे मोजावे लागणार आहेत. या दरांची तुलना करता ती एकूण खर्चाच्या 2.52 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे एम्पायर इस्टेटसमोरील उड्डाणपुलाला चिंचवडच्या बाजुने चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बांधण्याचे काम मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडूनच करून घेण्यात येणार आहे.