सोलापूर : “आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे पुस्तकाचे लेखक, भाजपचे नेते जयभगवान गोयल यांच्या विरोधात सोलापुरातील फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद दिनकर जगदाळे यांनी दिली आहे.
या पुस्तकावर देशभरात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून पुस्तकावर तातडीने बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. लेखक गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुस्तकात एकेरी भाषा वापरली आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली आहे.
एकूणच गोयल यांनी पुस्तकाच्या माध्यमातून शिवरायांचा अपमान केला आहे. यामुळे देशातील तमाम शिवप्रेमी व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे देशवासियांचे दैवत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचा अपमान सहन करणार नाही, असे जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, गोयल यांच्या या कृत्याचा निषेध म्हणून सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने गोयल यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे चार हुतात्मा पुतळा येथे दहन करण्यात आले.