दप्तर गहाळ करणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा

दोन ग्रामपंचायतींचे दप्तर घेऊन संबंधित ग्रामसेवक झाला फरार

अकोले – शेणीत व आंबेवंगण येथील ग्रामपंचायत दप्तर गहाळ करणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा ग्रामसेवक फरार झाला आहे. राजूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अकोले तालुक्‍यातील शेणीत व आंबेवंगण येथील ग्रामपंचायतीचे दप्तर तत्कालीन ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणसिंग यांनी गहाळ केलेले आहे. शिवाय सुमारे 94 लाख 17 हजार 692 रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी काशिनाथ धोंडीराम सरोदे यांनी राजूर पोलिसांत गुन्हा दाखल केला.

अकोले तालुक्‍यातील शेणीत व आंबेवंगण येथील ग्रामपंचायतीचा कार्यभार नोव्हेंबर 2013 ते मे 2018 यादरम्यान ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणसिंग यांच्याकडे होता. शेणीत व आंबेवंगण ग्रामपंचायत येथे कार्यरत असताना त्यांच्या ताब्यातील ग्रामनिधी व चौदावा वित्त आयोग, पेसा ग्रामसभा कोष निधी, पाणीपुरवठा निधी या खात्यावरील एकूण 94 लाख 17 हजार 692 रुपये रक्कम व अंदाजपत्रके तांत्रिक मान्यता न घेता नियमबाह्य खर्च करून सदरचे दप्तर गव्हाळ करत मोठा अपहार केला आहे. अपहार केल्याचे बॅंक स्टेटमेंट प्रमाणे दिसून येत आहे. तसेच त्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहाराची व दप्तर ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही. ग्रामपंचायत दप्तर स्वतःच्या ताब्यात ठेवलेले आहे. त्यामुळे त्याची तपासणी करता आलेली नाही.

तसेच शेणित ग्रामपंचायतचे 75 लाख 69 हजार 504 रुपये, तर आंबेवंगण ग्रामपंचायतीचे 18 लाख 48 हजार 188 रुपये, असे या दोन ग्रामपंचायतीचा एकूण 94 लाख 17 हजार 692 रुपयांचा अपहार केल्याचे दिसून येत असल्याची फिर्यादी अकोले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी काशिनाथ धोंडीराम सरोदे यांनी राजूर पोलिसांत दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन खैरनार करित आहेत. संबंधित ग्रामसेवकाचा शोध पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांत चांगलीच खळबळ उडाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.