फक्त 120 कोटी रुपयेच शिल्लक; खर्च मोठा
पुणे – करोनामुळे महापालिकेचे कंबरडे मोडले असून आर्थिक घडी अद्यापही पूर्णपणे बसताना दिसत नाही. पालिकेच्या तिजोरीत केवळ 120 कोटी रुपयेच शिल्लक असून भविष्यात उत्पन्न वाढले नाही तर महापालिकेवर ठेवी मोडण्याची वेळ येऊ शकते.
लॉकडाऊन आणि करोनाचे संकट यामुळे महापालिकेचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. त्यातून उत्पन्नाचे आणखी स्त्रोत महापालिकेला सापडलेले नाहीत. करोनाच्या उपाययोजनांमध्ये अन्य कामांची तरतूद वर्गीकरण करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेवर आथिक संकट उभे राहिले आहे.
सुमारे नऊ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसुलात खेळणाऱ्या महापालिकेला यंदाच्या वर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. 2019-20 याआर्थिक वर्षामध्ये महापालिकेला केवळ 4 हजार 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असताना देखील स्थायी समितीने 2021-11चे 7 हजार 390 कोटी रुपयांचेअंदाजपत्रक तयार केले. मात्र, करोनाच्या संकटामुळे हे उद्दिष्ट गाठणे अतिशय कठीण झाले आहे.
सहा महिन्यात एकूण अंदाजपत्रकाच्या निम्मे महसुली उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना महापालिकेला केवळ 1920 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यातही राज्यसरकारकडून मिळालेल्या 944 कोटी रुपयांमुळे महापालिका तरली आहे.
स्थायी समितीने एलबीटी आणि जीएसटीचे वार्षिक उत्पन्न 2077 कोटी रुपये अपेक्षित धरले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला केवळ हेच एक शाश्वत उत्पन्न यावर्षी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महापालिकेला प्रत्येक महिन्याला पगारासाठी 100 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. परंतु, करोनाचा खर्च वाढला आहे. साहजिकच अंदाजपत्रकामध्ये यासाठी काहीच तरतूद नसल्यामुळे अन्य तरतुदी या उपाययोजनांकडे वळवाव्या लागत आहेत. त्यामुळे महापालिकेवर आर्थिक बोजा पडला आहे.
आत्तापर्यंत 1805 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यामध्ये 1180 कोटी हा महसुली खर्च आहे. तर भांडवली खर्च 620 कोटी रुपये आहे. महापालिका आयुक्तांनी 40 टक्के “स’ यादीतील कामे करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यासाठीही पुरेसा निधी महापालिका प्रशासनाकडे नाही.
करोनाने सातवा वेतन आयोग आणि दिवाळी बोनसवरही गंडांतर आले असून, आताच्या परिस्थितीत हे दोन्ही देण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसेच नाहीत. त्यामुळे नाईलाजाने महापालिकेवर ठेवी मोडण्याचीच वेळ येण्याची शक्यता अधिक दाट आहे.
मिळकतकरातून 30 टक्केच उत्पन्न…
महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मिळकत करामधून महापालिका प्रशासनाला 750 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. महापालिका प्रशासनाने एकूण 2320 कोटी रुपयांचे अपेक्षित उत्पन्न धरले असल्यामुळे मिळकतकरातून सुमारे 30 टक्केच उत्पन्न मिळाले आहे.
इतर स्त्रोतांतूनही उत्पन्न कमीच…
बांधकाम परवानगीतून महापालिकेला 891 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ 75 कोटी रुपयेच मिळाले आहेत. अनुदान 52 कोटी मिळाले आहे. तर 200 कोटी रुपयांचे उद्दीष्ट असणाऱ्या पाणीपट्टीतून केवळ 50 कोटी रुपयांचे उत्पन्न पहिल्या सहा महिन्यामध्ये मिळाले आहे.
महापालिकेला गेल्या सहा महिन्यात अपेक्षित उत्त्पन्न मिळाले नाही. सध्या, केवळ 120 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत आहेत. आम्ही उत्पन्न वाढीसाठी अनेक तऱ्हेने प्रयत्न करत आहोत.
– विक्रम कुमार, महापालिका आयुक्त