पुणे – लोकसभा निवडणूक संपताच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभेसाठी महाविकास आघाडीने राज्यात कंबर कसली असली तरी पुण्यात मात्र, आघाडीत जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे.
पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात ५ भाजपचे, २ राष्ट्रवादीचे तर १ काँग्रेसचा आमदार आहे. तर, या विधानसभेसाठी शिवसेनेचा तीन जागांसाठी पक्षाकडे आग्रह असून रिपाईला १ जागा हवी आहे. त्यामुळे, पुण्यात जागा वाटपावरून वादाची शक्यता आहे. तर, त्याच वेळी महायुतीलाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
कारण, मनसे महायुतीत गेल्यास मनसेलाही पुण्यात १ जागा हवी असल्याचे सांगण्यात येत आहे. आठ जागांमध्ये पाच जागा भाजपकडे असल्याने मित्रपक्षांसाठी भाजप जागा सोडणार का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेला (शिंदे गट) हव्या राष्ट्रवादीच्या जागा…
शिवसेनेकडून शहरात तीन जागांचा आग्रह पक्षाकडे धरण्यात आला आहे. त्यात हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेनेचा आग्रह असलेल्या हडपसर, वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर खडकवासला भाजपकडे आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादाची शक्यता आहे.
हडपसरमधून शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे इच्छूक असल्याने शहरात एक जागा मिळाली तर ती हडपसर असावी अशी पक्षाची भूमिका असल्याची चर्चा आहे. खड्कवासला मागील तीनही निवडणुकीत भाजपने जिंकला असला तरी शिवसेनेनेही त्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला पुण्यात हडपसर किंवा खडकवासला या पैकी एक जागा मिळू शकते.
रिपाई- मनसेच्या भूमिकेकडे लक्ष…
रिपाईला राज्यात लोकसभेसाठी एकही जागा मिळालेली नव्हती त्यामुळे पक्षाकडून विधानसभेसाठी राज्यात १० ते १२ जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यात पक्षाला पुण्यातील कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघाची एक जागा पुण्यात हवी आहे. त्यातच, मनसेने अद्याप महायुतीत जाण्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे मनसे आयत्या वेळी महायुतीत आल्यास मनसेकडून कसबा अथवा खडकवासला विधानसभा मतदारसंघाची मागणी केली जाणार असल्याचे पक्षातील पदाधिकारी सांगत आहेत.
“भाजप म्हणून आमचे पाच आमदार आहेत. आठ विधानसभांमध्ये आमच्या जागा आहेत. त्यामुळे सहाजिकच आम्हालाच जादा जागा मिळतील, मात्र, जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. घटक पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर सर्वपक्षीय नेत्यांच्या सहमतीनेचे पुण्यातील जागा वाटप असेल.” – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप