मुंबई – कोविड ऑफिसर म्हणून लुबाडणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरलेला असताना काही भामटे याचाही गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल शेख हे 30 जून रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास चेंबूर येथील सरस्वती विद्यालयासमोरून चेंबूर स्टेशनकडे जात होते. यावेळी त्यांना वाटेत दोन भामटे भेटले. त्यांनी स्वतःला कोविड ऑफिसर म्हणून बतावणी करून अब्दुल शेख यांच्याजवळ असलेल्या साहित्याची तपासणी केली. अब्दुल शेखजवळ असलेल्या कॅनरा बॅंकेचे एटीएम घेऊन त्याचा पिन नंबर घेऊन अब्दुल शेख यांच्या अकाउंटमधून 54 हजार रुपये काढून घेतले.
याबाबत अब्दुल शेख यांनी तत्काळ चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. सीसीटीव्हीच्या सहाय्याने घटनास्थळी पोलिसांना एक होंडा सिटी गाडी दिसली, याच गाडीमध्ये हे दोन्ही भामटे आले होते. याचा तपास सुरू करत मुंबई पोलीस आरोपीपर्यंत पोचले. आरोपी सोहन वाघमारे याला पोलिसांनी अटक करून त्याच्या जोडीदाराचा शोध आता घेत आहेत.
सोहन वाघमारे हा चुनाभट्टी परिसरातच राहणार आहे. सोहन वाघमारे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीसुद्धा सायन पोलीस स्टेशन आणि नेहरूनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.