खेड, दि. 19 (वार्ताहर) -येथील खेड-आगवणवस्ती या बहुचर्चित अर्धवट रस्त्याची ग्रामस्थांमधून सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. खेड-आगवणवस्ती रस्त्याची कहाणीच न्यारी… दोन आमदारांना पडतोय एक ठेकेदार भारी! अशी म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.
या रस्त्याचे उद्घाटन आ. राम शिंदे आणि आ. रोहित पवार या दोघांनीही मोठ्या दिमाखात केले. मात्र, उद्घाटन केलेल्या या रस्त्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य गेल्या पाच वर्षांपासून दोघांच्याही नशिबात नाही हे दुर्दैव! खेड ग्रामपंचायतींतर्गत सन 2018मध्ये खेड राज्यमार्ग ते आगवणवस्ती हा 1 किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला. त्या वेळी तब्बल 87 लाखांचा निधी या रस्त्यासाठी उपलब्ध झाला होता. आ. शिंदे यांनी उद्घाटन केले. मात्र, या रस्ताकामाचा प्रारंभ खेड राज्यमार्गापासून न करता तो शेवटच्या दिशेने करावा, अशी मागणी काही ग्रामस्थांनी आ. शिंदे यांच्याकडे केली होती.
काही ग्रामस्थांच्या मते उलट दिशेने काम न करता राज्यमार्गापासूनच काम व्हावे, अशी मागणी केली होती. हा रस्ता शासकीय निविदेप्रमाणे राज्यमार्गापासूनच होण्यासाठी काही ग्रामस्थांनी माजी मंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. संबंधित कार्यालयाकडे त्याबाबत लेखी तक्रारीही करण्यात आल्या. त्यानंतर हे काम भूमिपूजन होऊन “जैसे थे’ अवस्थेत राहिले. ग्रामस्थांचे म्हणणे लक्षात घेऊन रोहित पवार यांनी आमदार झाल्यावर हा रस्ता पुन्हा फेरसर्वेक्षण करून शासन निर्णयानुसार पूर्ववत करून घेतला.
त्यानंतर या रस्त्याचे आ. रोहित पवार यांच्या हस्ते पुन्हा एकदा सन 2020मध्ये भूमिपूजन झाले. भूमिपूजनानंतर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर काम सुरूही झाले. मुरूम, माती, सिमेंट पाईप आणून खडीकरणही झाले; पण हे काम तालुक्यातील एका नामांकित ठेकेदाराने केले असून, काम निकृष्ट असल्याचा आरोप करत या कामाच्या दर्जाबाबत कडाडून विरोध झाला. त्यानंतर आजतागायत हे काम बंदच आहे. आ. शिंदे आणि आ. पवार या दोघांनाही आजतागायत हा तिढा सुटू शकला नाही.
राजीनामा द्या.. !
अनेक वर्षांपासून अर्धवट असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी फक्त उद्घाटनाचा घाट घातलेल्या आमदारद्वयींनी संबंधित रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. दोन आमदार मोठे की एक ठेकेदार मोठा, असा सवाल करत जमत नसेल तर दोन्ही आमदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.