बारामती (प्रतिनिधी) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने लोकसहभागातून बारामती शहरात डॉ. बाबासाहेबआंबेडकर विद्यार्थी वस्तीगृहात पहिल्या कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे.१०० रुग्ण क्षमतेच्या या सेंटरमुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.
बारामती शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण कमी करण्यासाठी व रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली असून बारामती शहर व तालुक्यात विविध कार्यकर्ते तसेच संस्थांच्या माध्यमातून कोविड केअर सेंटरची निर्मिती होणे गरजेचे आहे असे मत किरण गुजर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, उपविभागीय अभियंता विश्वास ओहोळ, नगरसेविका नीता चव्हाण व मयूरी शिंदे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ , अक्षय महाडिक आदी उपस्थित होते.
या कोविड सेंटरमध्ये निवास, भोजन, चहा, नाश्ता यासह इतर सुविधा नटराजच्या वतीने विनामूल्य पुरविल्या जाणार आहेत. या शिवाय डॉक्टर व परिचारिकांची सेवा, नियमित तपासणी, औषधोपचार अशी कामे आरोग्य विभागाच्या वतीने केली जातील. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जेव्हा या सेंटरमध्ये रुग्णाला दाखल करण्याचा निर्णय डॉक्टर घेतील, तेव्हा संबंधित रुग्णाला रुग्णवाहिकेच्या मदतीने सेंटरमध्ये दाखल करण्यापासून ते 14 दिवस त्याला तेथे ठेवण्यासह त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार आहे. रुग्णास कोणताही खर्च येणार नाही असेही किरण गुजर यांनी यावेळी स्पष्ट केले.
बारामती शहरात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय यंत्रणेच्या मदतीतून व लोकसहभागातून अशा प्रकारची कोविड केअर सेंटर उभा राहणे गरजेचे आहे. नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. नागरिकांनीही दक्षता दक्षता घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.
– विजय पाटील, तहसीलदार बारामती