नवी दिल्ली: देशभरातील 18 राज्यांमध्ये प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय अन्य 5 राज्यांमध्येही अंशतः बंदी लागू करण्यात आली आहे. या पाच राज्यांमध्ये धार्मिक आणि ऐतिहासीक ठिकाणी प्लॅस्टिकला मनाई आहे, अशी माहिती केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्डाने (सीपीसीबी) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणला(एनजीटी) दिली आहे. तसेच प्लॅस्टिक निर्मुलनासाठी 12 राज्यांनी योजना आखली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
एनजीटीने सीपीसीबीला प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016च्या अंमलबजावणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत पुढील स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुढील कारवाई करण्यास सांगितले होते.
प्लॅस्टिकचे प्रदुषण रोखण्यासाठी 18 राज्यांमध्ये कॅरीबॅगवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्लॅस्टिक बंदी कायदा लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या राज्यांमध्ये पर्यटनस्थळावर अशा वस्तूंना प्रतिबंध घालण्यात आला आहे, अशी माहिती एनजीटीचे प्रमुख न्या. ए. के. गोयल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला देण्यात आली आहे.
देशातील 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अद्याप ही बंदी लागू करण्यात आलेली नाही. तसेच ओडीसाकडून बंदी लागू करण्यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.