बाबुराव वायकर यांची माहिती : 4.81 कोटींचा निधी मंजूर
वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायत हद्दीतील मुख्य बाजारपेठेतील जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या (चाफ्याची शाळा) जागेवर चार मजली व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. या संकुलासाठी 4 कोटी 81 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर यांच्या विशेष प्रयत्नातून या व्यापारी संकुलासाठी सुमारे पाच कोटी निधी मंजूर झाला आहे.
या व्यापारी संकुलामध्ये पार्किंग, तळमजल्यावर शॉपिंग गाळे, पहिल्या मजल्यावर शॉपिंग गाळे, दुसऱ्या मजल्यावर शॉपिंग गाळे व वाचनालय, तिसऱ्या मजल्यावर सांस्कृतिक भवन, रूम आणि चौथ्या मजल्यावर राखीव हॉल व रूम त्याचबरोबर दोन लिफ्ट, स्वच्छतागृह अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
बाजारपेठेत चार गुंठे जागेत स्वातंत्र्यपूर्वी काळात बांधलेली जिल्हा परिषदेची जुनी शाळा अर्थात चाफ्याची शाळा अशी जुनी ओळख असलेली शाळा, अत्यंत जीर्ण व धोकादायक झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून वापरासाठी बंद करण्यात आली आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही इमारत पाडून जिल्हा परिषदेला उत्पन्नाचे साधन व्हावे हा मानस मनी बाळगून त्याठिकाणी व्यापारी संकुल बांधण्याचा प्रस्ताव गतवर्षी बाबुराव वायकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम समितीकडे दिला होता.
त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने सध्याची इमारत धोकादायक असल्याचा व इमारत पाडण्यास हरकत नसल्याचा दाखला दिला आहे. या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. त्यासाठी 4 कोटी 81 लाखांचा निधी मंजूर केला आहे.
मावळ तालुक्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या वडगाव शहरातील हे पहिलेच चार मजली व्यापारी संकुल ठरणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला उत्पन्न मिळेलच; परंतु छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल.
– बाबुराव वायकर, सभापती, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती.