फ्लोरिडा – भारत व वेस्ट इंडिज संघांना अखेर अमेरिकेने व्हिसा दिला. त्यामुळे आता या दोन संघात येथील लॉडरहील मैदानावर होणारे दोन्ही टी-20 सामने खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळत असून यातील तीन सामने वेस्ट इंडिजमध्ये झाले आहेत. आता उर्वरित दोन सामने फ्लोरिडात होणार होते. मात्र, यासाठी दोन्ही देशांच्या खेळाडूंना अमेरिकेने व्हिसा दिला नव्हता, त्यामुळे हे सामने रद्द होणार का, वेस्ट इंडिजमध्येच खेळवले जाणार याची चर्चा सुरू झाली होती.
मात्र, आता व्हिसा मिळाल्याने हे सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील, असे दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी सांगितले आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह सर्व खेळाडू येथे दाखल झाले असून वेस्ट इंडिज संघही दाखल झाला आहे. भारतीय संघ या मालिकेत 2-1 असा आघाडीवर आहे.