वाघोली – वाघोली येथील गायरान जमिन गट नं. १११९ व ११२३ मधील एकुण ३.५ एकर जागेमध्ये सिव्हिल हॉस्पिटल व ट्रामा सेंटर सुरु करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली शासनस्तरावर यासाठी सद्या प्रशासकीय स्तरावरील पाठपुरावा सुरू असून लवकरच हॉस्पीटल सुरू होणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिली आहे.
याबाबत रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले की, ग्रामपंचायत वाघोलीने ग्रामसचिवालय बांधकामासाठी वाघोली येथील गायरान जमिन गट नं. १११९ व ११२३ मधील एकुण ३.५ एकर जागा महाराष्ट्र शासनाकडुन मुख्य कार्यराकी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचे नावे वर्ग करुन घेतली होती. परंतु वाघोली गावचा दिनांक ३०/०६/२०२१ रोजी पुणे महानगर पालिकेमध्ये समावेश झाला आहे. सदर जागेचा ७/१२ मुख्य
कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे नावे असल्याने सदर जागा पुणे महानगर पालिकेकडे वर्ग झालेली नाही.
वाघोली हे गाव पुणे-नगर रस्त्यावरील मुख्य गाव आहे. वाघोली गावाची आज रोजीची लोकसंख्या २ ते २.५ लाख इतकी आहे. तसेच वाघोली व पुणे शहराच्या पुर्व भागामध्ये २५ गावे आहेत. या गावामध्ये सर्व प्रकारच्या सोयी असणारे कोणतेही शासकीय मोठे रुग्णालय नाही, त्यामुळे वाघोलीपासुन लोणीकंद, शिक्रापुर, शिरुर ते नगरपर्यंत सर्व रुग्णांना उपचारासाठी पुणे येथील सिव्हिल हॉस्पीटल मध्ये जावे लागत आहे.
या सर्व रुग्णांना पुण्यामध्ये जाणेसाठी वाघोली मधूनच जावे लागते. परंतु दिवसेंदिवस वाघोलीपासुन पुणे शहरामधील वाढत असणारी गर्दी व त्यामुळे होणारी वाहतुक कोंडीमुळे कित्येक रुग्णांना वेळेमध्ये उपचार मिळत नाही. वाघोली येथील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचे मालकीची गायरान जमिन गट नं. १११९ व ११२३ मधील पुणे नगर रस्त्यावरील केसनंद फाटा या ठिकाणचे एकुण ३.५ एकर क्षेत्रामध्ये वाघोली व परिसरामधील लोकांसाठी सिव्हिल हॉस्पीटल व ट्रामा सेंटर सुरु केल्यास निश्चितपणे वाघोलीसह पुर्व भागामधील २५ गावे व नगर महामार्गाद्वारे पुण्यामध्ये येणा-या सर्वच रुग्णांसाठी याचा फायदा होणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.
वाघोली येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. वाघोलीतील जिल्हा परिषदेच्या मालकीची
तीन एकर १७ गुंठे जमीन असून ही जमीन ग्रामीण रुग्णालयासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नावे हस्तांतरित करण्यास जिल्हा
परिषदेने मान्यता दिली आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी सुचविलेल्या या प्रस्तावाला कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी अनुमोदन दिले आहे.
आता, जागा असतानाचा हा प्रस्ताव शिफारस करून ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले आहे.
दाभाडे यांच्या भेटी गाठींना वेग …
वाघोली येथे सर्व सोईयुक्त हॉस्पिटल व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच प्रशासकीय अधिकारी वर्ग यांचेकडे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांचा पाठपुरावा तसेच भेटीगाठींचा वेग वाढला आहे.