पुणे -सिगारेट ओढण्याच्या कारणातून झालेल्या भांडणात एका व्यक्तीने दोघांच्या तोंडावर ऍसिडसारखा ज्वलनशील पदार्थ फेकल्याची घटना बाणेर परिसरात घडली. यामध्ये या दोन्ही व्यक्तीचा चेहरा, डोके, छाती आणि ओठांना गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकरणी विकास पडळपरे (वय 29, रा. बाणेर फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज दुबे (रा. मूळ उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी घडला. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली होती. दरम्यान, फिर्यादी हे आरोपीच्या गॅरेज कंपाऊंडच्या आतील मोकळ्या जागेत सिगारेट ओढण्यासाठी गेले होते. त्यावरून दोघांमध्ये झटापट झाली. यावेळी फिर्यादींचा मित्र भांडण सोडवण्यासाठी आला असताना आरोपीने त्या ठिकाणी असलेल्या ऍसिडसारखा ज्वलनशील पदार्थ दोघांच्याही अंगावर फेकला. त्यामध्ये दोघांना जखम झाली.