पुणे – व्हॅलेंटाईन डे ला एका तरुणीने मित्रासाठी झोमॅटो ॲपवरुन चॉकलेट शेक मागवला होता. हा शेक पित असतानाच त्यांना आत एक उंदराचे मृत पिल्लू सापडले. या किळसवाण्या प्रकारामुळे त्यांना मोठा धक्का बसला. या धक्कयातून सावरत त्यांनी कॅफे चालकाला जाब विचारला मात्र त्याने उलट धमकी दिली. याप्रकरणी कॅफे चालकाविरुध्द विमनातळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चऱ्होली येथे रहाणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनूसार लोहगाव येथील कॅफे चॉकलेट दुकानाचे मालक संतोष महादेव मोरे (विश्रांतवाडी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादीच्या २० वर्षीय मैत्रिणीने झोमॅटोवरुन चॉकलेट शेक मागवला होता. हा शेक बनवताना मिक्सरच्या भांड्यात अगोदरच उंदराचे पिल्लू मृत होऊन पडले होते. त्याच अवस्थेत चॉकलेट शेक बनवून कॅफे चालकाने झोमॅटो कर्मचाऱ्याला डिलिव्हरीसाठी दिला. हा शेक पिल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकते, याची जाणीव असतानाही, हे कृत्य केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार ए.एस.आदलिंग करत आहेत