पुणे : पुण्याच्या नायडू विलगता कक्षात कोरोना विषाणूच्या (2019-nCoV) संसर्गाच्या संशयिताला दिलेल्या उपचाराबद्दल आणि आरोग्य सेवेबद्दल चीनी नागरिकाने भारतीय आरोग्य सेवेचे आभार मानले आहेत. त्यानंतर आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने ट्विट करून ‘केअरींग फॉर ऑल’ पुण्याच्या नायडू रुग्णालयात विलगता कक्षात # COVID19 # उपचार घेणाऱ्या चीनी नागरीकाचे विचार असे म्हणत हे पत्र पोस्ट केले आहे.
चीनी नागरीकाने आरोग्य प्रशासनाला हे पत्र लिहले आहे. हे पत्र हाताने लिहले असून त्यात तो म्हणतो, मला अचानक तेथे पाठवण्यात आले. सुविधा आणि भाषेच्या समस्येमुळे सुरवातीला मी खूप निराश झालो होतो. मात्र येथे खाद्य पदार्थांची खरेदी, स्वच्छता आणि धुण्याच्या सुविधांसह सर्व काही सुरळीत पार पडत आहे. मी विलगता कक्षात असलो तरी एकाकी पडल्याची भावना येत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर, परिचारीका आणि अन्य कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार. त्यांना 2020साठी शुभेच्छा! या पुढे त्याने पत्र स्थानिक भाषेत लिहले आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस चीनमधील वुहान येथून कोरोना विषाणूंच्या साथीला सुरवात झाली. त्यानंतर या शहराला बंद करून टाकण्यात आले. मात्र तरीही ही साथ 20 देशांत पसरली. चीनमध्ये शेकडो लोक या विषाणूंनी बाधीत आहेत. चीनमधील मृतांची संख्या एक हजार 367 वर पोहोचली आहे. तर सुमारे साठ हजार जणांना त्याची बाधा झाली आहे. हा विषाणू भारतात पसरू नये म्हणून भारत सरकार प्रतिबंधात्मक उपाय करत आहे.
या साथीला रोखण्यासाठी भारत सरकार अफगाणीस्तान आणि मालदिव येथील सरकारला आवश्यक ती मदत करत आहे. मालदिवच्या नागरिकांसह 654 जणांची वुहानमधून भारत सरकारने सुटका केली होती. 15 हजार 991 लोकांना संशयित म्हणून विलगता कक्षात ठेवण्यात आले. त्यातील तीन हजार 58 लोकांनी 28 दिवासांचे वैद्यकीय निरीक्षण पूर्ण केले. 497 जणांना विलगता कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.