नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत सहभागी झालेल्या पत्रकाराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भोपाळ पोलिसांनी शुक्रवारी रात्री या पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल केला. कमलनाथ यांनी २० मार्च रोजी आपल्या निवासस्थानी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत कोरोनाबाधित पत्रकार सहभागी झाले होते.
कोरोनाबाधित पत्रकाराची मुलगी १८ मार्च रोजी लंडनवरुन आली होती. त्यामुळे पत्रकार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तरी सुद्धा ते २० मार्च रोजी कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. पत्रकार परिषदेनंतर आलेल्या तपासणी अहवालामध्ये पत्रकार आणि त्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या पत्रकार आणि त्यांच्या मुलीवर भोपाळच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भोपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळ शहराच्या श्यामला हिल्स पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना विषाणूसंदर्भात सरकारने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.