महिलेविरुध्द कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे(प्रतिनिधी) – परदेशातून आल्यानंतर क्वारंटाईन न झालेल्या महिलेविरुध्द कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमानूसार संबंधीत महिलेला हॉटेलमध्ये क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले होते. मात्र ती थेट कोथरुड येथील तीच्या घरी गेली.
संबंधीत महिला मस्कत येथून फ्लाईटने मुंबई विमानतळ येथे आली होती. त्यानंतर तीला हॉटेलमध्ये क्वारंटाईन होणे आवश्यक होते. तीला पुणे व पिंपरी चिंचवड हॉटेल विलीनिकरण कक्षातील नियंत्रण अधिकारी सतीश इंगळे यांनी तुम्ही शासनाने नेमून दिलेल्या जवळच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हा, अन्यथा आपल्यावर गुन्हा दाखल करावा लागेल असे व्हॉटस अप मेसेजव्दारे कळवले होते.
तीला परदेशातून आलेल्या भारतीय नागरिकांकरीता महाराष्ट्र शासनाच्या क्वारंटाईनबाबतच्या सर्व नियमावली पाठवण्यात आल्या होत्या. तरीही त्या कोथरुड येथील घरी गेल्या. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.