अहिल्यानगर, – टेम्पोतून बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या पाच गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि भारतीय प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी चांगदेव गोरख भालसिंग (वय 32 रा. वाळकी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
संतोष तुकाराम गाडे (वय 36 रा. अंमळनेर, ता. पाटोदा, जि. बीड), अंकुश लक्ष्मण गाडे (वय 52 रा. कोतन, ता. पाटोदा, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. अहिल्यानगर- कल्याण रस्त्यावर जखणगाव (ता. नगर) शिवारात सोमवारी (2 डिसेंबर) दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, टेम्पोसह पाच जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
टेम्पो (एमएच 14 एलबी 2787) व जनावरे असा एकुण दोन लाख 98 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. एका टेम्पोतून गोवंशीय जनावरे वाहतुक केली जात असल्याची माहिती भालसिंग यांना मिळाली होती. त्यांनी सदरचा टेम्पो जखणगाव शिवारात पकडून नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून टेम्पो व जनावरे पंचासमक्ष ताब्यात घेतली. सदरची जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशयावरून दोघांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार झावरे करत आहेत.