पिंपरी – पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही विनापरवाना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित शंकर लांडे आणि मयुर नामदेव रानवडे (दोघेही रा. कासारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलीस हवालदार दत्तात्रय बाळासाहेब कांबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कै. शंकर (तात्या) लांडे स्पोटर्स फाऊंडेशनच्या वतीने 22 मे रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत तानाजी लांडगे क्रीडांगण येथे गौतमी पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी नाकारली होती. तसेच आयोजकांना वरिष्ठ कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेण्याबाबत सांगण्यात आले होते. तरीदेखील आयोजनकांनी याकडे दुर्लक्ष करीत विनापरवाना कार्यक्रमाचे आयोजन केले. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार तिटकारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.