परळी – विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात ‘गुड मॉर्निंग सर’ म्हटल्याने विद्यार्थ्यांना छडीने बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी फड असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी फड हे परळी शहरातील वडसावित्री नगर परिसरातील मराठवाडा उसतोड कामगार मंडळ संचलित श्री नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत आहेत. ते इयत्त आठवीच्या वर्गात गेले असता, विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात गुड मॉर्निंग सर म्हंटले. याचा राग आल्याने फड यांनी विद्यार्थ्यांना छडीने बेदम मारहाण केली.
विद्यार्थ्यांनी हा प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला. मुख्याध्यापकांनी विद्यालय अध्यक्षांकडे तक्रार केली. अध्यक्षांनी फड यांना जाब विचारला असता अध्यक्षांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष भिमराव सातभाई यांनी परळी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून शिक्षक फड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.