कोल्हापूर – सेवानिवृत्त शिक्षकाकडे लाच मागणाऱ्या लिपीकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम बळवंत कांबळे (वय 46) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपीकाचे नाव आहे. कांबळे हा वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक हत्तीमहल, येथील लिपीक आहे. संबंधित शिक्षकाच्या भविष्य निर्वाह निधीचे प्रस्तावाचे कामकाज लवकर पूर्ण करण्यासाठी कांबळेने 23 हजारांची लाच मागितली होती.
तक्रारदार शिक्षक हे 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी भविष्य निर्वाह निधीतील रक्कमेसाठी किणी हायस्कुलकडे अर्ज केला होता. त्या अर्जावर प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय हत्तीमहल, कोल्हापूर या कार्यालयास पाठविण्यात आला होता. त्या अर्जाचा पाठपुरावा करित असताना तक्रारदार यांना कांबळेची भेट झाली.
लिपीक कांबळेने काम लवकर पूर्ण करण्यासाठी साहेबांची सही घेण्यासाठी 25 हजार लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या तपासात कांबळेने 23 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याबाबत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.