डोर्लेवाडी (पुणे) – बारामती शहरात आयोजित हिंदू जनगर्जना मोर्चात दोन धर्मात तेढ निर्माण करीत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज ऊर्फ अभिजीत धनंजय सराग (रा. अकोला) व या मोर्चाचे आयोजक विकास महादेव देवकाते या दोघांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, (दि.9) फेब्रुवारी रोजी बारामतीमध्ये हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी कालीचरण महाराज यांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी त्यांनी हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य तसेच जातीय तणाव निर्माण करणारे वक्तव्य केले होते. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अतुल उत्तम जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 153, 505 (2), 34 नुसार, तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) नुसार गुन्हा दाखल केला आहे.