लंडन – ब्रिटनच्या पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या 10 डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीने कार धडकावली. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
गुरुवारी दुपारी साडे 4 वाजण्याच्या सुमारास डाऊनिंग स्ट्रीटच्या व्हाईटहॉल येथील प्रवेशद्वारावर ही कार धडकवण्यात आली. गुन्हेगारी स्वरुपाच्या कृत्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्वरित या कारच्या चालकाला अटक केली. या कारच्या धडकेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोणीही जखमी झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर पोलिसांनी या परिसराची नाकाबंदी केली आणि संबंधित चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केली. डाऊनिंग स्ट्रीट हा परिसर राजकीय नेत्यांच्या रहिवासाचा भाग आहे.
तसेच ट्रापेलगार चौक आणि संसद चौकाच्या दरम्यानच्या या परिसरामध्ये अनेक महत्वाच्या व्यक्तीची निवासस्थाने आहेत. या परिसरात राहणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींना घरातच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, ही घटना घडली तेंव्हा सुनक त्यांच्या कार्यालयातच होते का हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.