नगर, (प्रतिनिधी) – सोलापूर महामार्गालगत असलेल्या वाटेफळ (ता. नगर) शिवारात रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यावसायिकाला व त्याच्या मित्राला ९ दरोडेखोरांच्या टोळीने मारहाण करत त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा २ लाख ३१ हजारांचा ऐवज तसेच परवाना असलेला पिस्तुल पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत निखील संजय अच्छा (वय ३४, रा. शिक्षक कॉलनी, रामलिंग रोड शिरूर, जि. पुणे) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.१७) फिर्याद दिली आहे. फिर्यादी अच्छा यांचा गोळ्या बिस्किटे होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे.
या व्यवसायानिमित्ताने ते मंगळवारी दुपारी वाटेफळ जवळच असलेल्या बीड जिल्हा हद्दीतील काही गावात गेले होते. तेथून परतत असताना वाटेफळ शिवारात नगर -सोलापूर महामार्गापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला चारचाकी गाडी उभी करून लघुशंकेसाठी थांबले होते.
त्यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे मित्र अरुण मधुकर कानडे हे ही होते. हे दोघे गाडीतून खाली उतरल्यावर जवळच असलेल्या शेतातून ९ दरोडेखोरांची टोळी आली. त्यांनी दोघांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना धमकावत त्यांच्या जवळील सोन्याच्या अंगठ्या, चेन रोख रक्कम असा २ लाख ३१ हजारांचा ऐवज तसेच त्यांच्या जवळ परवाना असलेला पिस्तुल पळवून नेला.
हद्द निश्चितीचा वाद : पोलिसांकडून गुन्ह्याची टोलवा-टोलवी
फिर्यादी यांनी तातडीने शिरूरला जावून पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. ही घटना नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असल्याने शिरूर पोलिसांनी त्यांना नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी निखील अच्छा यांच्या फिर्यादी वरून अज्ञात ९ दरोडेखोरांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला. स.पो.नि. प्रल्हाद गिते व पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग यांनी फिर्यादी व पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिल्यानंतर सदर घटना ही बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नगर तालुका पोलिसांनी सदर गुन्हा तपासासाठी अंभोरा पोलिसांकडे वर्ग केला आहे.