नगर तालुक्‍यात चोऱ्यांचे सत्र सुरु

डोंगरगणला मते दाम्पत्याला मारहाण : मांजरसुंभ्यांत वाघमारे यांच्या घरी चोरी

नगर – तालुक्‍यातील डोंगरगण-वांबोरी घाटातील रस्ता लुटीच्या घटना ताज्या असतांनाच वांबोरी-नगर रस्त्यावर असणाऱ्या डोंगरगण आणि मांजरसुंभे गावात बुधवारी पहाटे दीड ते दोनच्या सुमारास दोन ठिकाणी धाडसी चोऱ्या झाल्या. यात डोंगरगण येथील मते नव दामप्त्याला चोरट्यांनी मारहाण करत अडीच तोळ्याचा ऐवज लुटून नेला. तर मांजरसंभे येथील वाघमारे यांच्या घरातून दहा ते पंधरा हजारांचा ऐवज चोरून नेला.

डोंगरगण फाटा चौकात अर्जुन मते यांचे घर आहे. या घरात मते परिवारातील दोघ पती-पत्नी झोपलेले होते. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी घरात प्रवेश करत आधी मते यांच्या घरातील दोन खोल्यात समानाची उचकापाचक केली. यात हाती काहीही न लागल्याने त्यांनी अखेर मते दामप्त्य झोपलेल्या खोलीत प्रवेश केला. यावेळी राहुल मते याने आरडा-ओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बेदाम मारहाण करण्यात आली. यावेळी घाबरलेल्या राहुलच्या पत्नीने अंगावरील दागिने चोरट्यांना काढून दिले. त्यानंतर लोक जागे झाल्याची चाहूल लागताच चोरटे दुचाकीवर पसार झाले.

तत्पूर्वी चोरट्यांनी मांजरसुंभे गावाच्या गावठाण हद्दीत राहणारे जालींदर वाघमारे यांच्या घरी चोरी केली. वाघमारे यांच्या घरातील व्यक्त नगरला दवाखान्यांत असल्याने घरी कमी लोक असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. दोन्ही चोरीच्या घटनेनंतर चोरटे नगरच्या दिशेने पसार झाले. चोरट्यांकडे शाईन गाडी असल्याचे डोंगरगण ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बुधवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटना स्थळी दाखल झाले. यावेळी श्‍वान पथक देखील होते. मात्र, चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याने त्याचा उपयोग झाला नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांबोरी- डोंगरगण घाट हा एमआयडीसी पोलीसांच्या हद्दीत येतो. या ठिकाणी पूर्वी रस्ता लुटीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी गस्त सुरू केली. त्यानंतर या घटनांना काही प्रमाणात आळा बसला. मात्र,अलिकडच्या काळात एमआयडीसी पोलीसांची वांबोरी फाटा मार्गे पिंपळगाव फाटा, डोंगरगण आणि वांबोरी घाटातील गस्त बंद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे हा रस्ता असुरक्षित बनला असून एमआयडीसी पोलीसांनी याकडे गांर्भियाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.