थेऊर – हवेली तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षातील महिला कोतवालावर लाच स्वीकारल्याप्रकरणी एसीबीने 11 फेब्रुवारीला सायंकाळी कारवाई केली. याप्रकरणी लाचखोर महिलेने रोख रक्कम लाचस्वरुपात घेताना एक गुंठा जमीन मागणी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत खडक पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
सुवर्णा भोसले असे कारवाई झेलल्य महला कोतवालाचे नाव आहे. तक्रारदार यांना बालेवाडी (ता. हवेली) येथील जागेची आरटीएस फाईल्सची सांक्षाकित प्रत हवी होती.त्याकामी त्यांनी हवेली अभिलेख कक्षात रितसर अर्जही दाखल केला होता.
मात्र या कामी अभिलेख कक्षातील लोकसेवक कोतवाल सुवर्णा भोसले यांनी फाइलच्या सांक्षाकित प्रतसाठी 25 हजार रुपयांची लाच मागणी केली. यामुळे संबंधित तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. शासकीय पंचाच्या समवेत झालेल्या पडताळणीमध्ये तडजोडी अंती पंचवीस हजार रुपयांची रक्कम पंधरा हजार रुपये व एक गुंठा जमीन लाच स्वरुपात मागितल्याचे निष्पन्न झाले.
संबंधित लोकसेवक महिलेला प्रत्यक्षात पंधरा हजार रुपये स्विकारताना ताब्यात घेतले आहे. हवेलीतील महिला लोकसेवकाला ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, पुणे परिक्षेत्रचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अलका सरग या करीत आहेत.