नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावर ब्रिटीश संसदेच्या गटाचे प्रमुख असणाऱ्या ब्रिटीश खासदाराला इ व्हिसा रद्द झाल्याने भारतात प्रवेश नाकारण्यात आला. आपण नवी दिल्ली उतरल्यावर आपला इ व्हिसा रद्द झाल्याचे आपणास सांगण्यात आले असल्याचा दावा या खासदाराने केला आहे.
डेब्बी अब्राहम या मजूर पक्षाच्या खासदार आहेत. काश्मीर प्रश्नावर त्या भारताच्या भूमिकेच्या टीकाकार मानल्या जातात. त्या ब्रिटीश संसदेच्या काश्मीर संबंधित गटाच्या प्रमुख आहेत. त्या म्हणाल्या माझा इ व्हिसाची मुदत ऑक्टोबर 2020 पर्यंत आहे. मात्र सोमवारी मी दिल्लीत आले. त्यावेळी मला माझा इ व्हिासा रद्द झाला असल्याचे सांगण्यात आले, असे त्यांनी ट्विट केले आहे.
अब्राहम यांच्याशी पीटीआय वृत्तसंस्थेने संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, मला 13 फेब्रुवारीपर्यंत या संदर्भातील कोणताही इ मेल आला नव्हता. त्यानंतर मी प्रवासासाठी बाहेर पडले. त्यामुळे कार्यालयाशी संपर्क झालेला नाही. आपल्या निवेदनात अब्राहम लिहतात, मी ज्यावेळी विमानतळावरील इमिग्रेशन डेस्कवर पोहोचले, त्यावेळी मी माझा इ व्हिसा आणि अन्य कागदपत्रे दाखवली. त्यावेळी तो अधिकारी स्क्रिनकडे पाहून डोके हलवू लागला. त्याने नंतर मला सांगितले तुमचा व्हिसा रद्द झाला आहे. त्यानंतर त्याने माझा पासपोर्ट घेतला. त्यानंतर तो 10 मिनिटे बेपत्ता झाला.
तो परत आला त्यावेळी तो माझ्यावर खेकसू लागला. मी असे ओरडू नका असे म्हणाले त्यावेळी त्याने मला दुसऱ्या निमर्नुष्य विभागात नेले. त्याने मला बसण्यास सांगितले. त्याच्या हालचालींमुळे लोकांनी मी दिसावे या हेतूने मी बसण्यास नकार दिला. त्यानंतर हा अधिकारी पुन्हा गायब झाला. त्यावेळी मी ज्यांच्याकडे राहणार होते, त्या माझ्या नातेवाईकांना फोन केला. त्यांनी ब्रिटीश दुतावासाशी संपर्क साधला आहे.
त्यानंतर बऱ्याच वेळाने इमिग्रेशन अधिकारी माझ्याकडे आले. त्यांनाही माझा व्हिसा का रद्द केला आहे, त्याची कल्पना नव्हती. माझ्यावर खेकसणारा अधिकारीही त्यांच्यासोबत होता. तो ही आता शांत झाला होता. त्याला महीत नव्हते. त्याने घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आता परतण्यासाठी मी वाट पहात आहे, असे या ब्रिटिश खासदराने म्हटले आहे.