किवळे परिसरातील घटना : जखमी महिलेवर उपचार सुरू
देहुरोड – किवळे परिसरातील आदर्शनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीची संरक्षक भिंत गुरुवारी (दि. 16) दुपारी कोसळली. या भिंतीलगत आपल्या मुलाला शेजारी बसवून काम करणाऱ्या गरोदर मजूर महिला आणि बालक या पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी “वायसीएम’ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मुन्नी संतोष राठोड (अंदाजे वय 30) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. बालकाचे नाव समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे-आदर्शनगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. दुपारी चारच्या सुमारास जखमींना प्रथम देहूरोड, किवळे येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पिंपरी येथील “वायसीएम’ रूग्णालयात हलविण्यात आले.
देहुरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.