मुंबई – जागतिक व्यापार ज्या डॉलरच्या माध्यमातून होतो त्या अमेरिकन डॉलरवर नियंत्रण असणाऱ्या फेडरल रिझर्व्ह काहीसे मवाळ पतधोरण जाहीर झाले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारांबरोबरच भारतीय शेअर बाजार निर्देशांकात शुक्रवारी वाढ नोंदली गेली.
पतधोरणातील आकडेवारीपेक्षा गुंतवणूकदारांचे लक्ष फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पावेल यांच्या पतधोरणानंतरच्या पत्रकार परिषदेकडे होते. यावेळी पावेल यांनी सांगितले की आम्ही निश्चितच महागाई कमी करण्यासाठी प्राधान्यक्रम देणार आहोत. त्याचबरोबर अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीत जाऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची आमची जबाबदारी आहे.
महागाई रोखण्यासाठी अगोदरच व्याजदरात बरीच वाढ केली आहे आणि आता पुन्हा 0.75 टक्क्यांची वाढ करण्यात येत आहे. मात्र आगामी काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात व्याजदर वाढीची गरज भासणार नाही. जेरोम यांच्या या वक्तव्यानंतर लगेच विविध देशातील शेअर बाजार निर्देशांकात वाढ होण्यास सुरुवात झाली.
अमेरिकेच्या व्याजदर वाढीचा भारतीय शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होत होता. मात्र फेडरल रिझर्व्ह आगामी काळात जास्त व्याजदर वाढ करणार नाही याचा अंदाज गुंतवणूकदारांना आल्यामुळेच गेल्या आठवड्यामध्ये शेअर बाजारात बरीच खरेदी झाली होती. त्याचबरोबर परकीय संस्थागत गुंतवणूकदार भारतात खरेदी करू लागले होते. पतधोरण जाहीर झाल्यानंतर लगेच भारतीय रुपयाच्या मूल्यांमध्ये बरीच सुधारणा झाली.
याचा अर्थ परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी वाढविण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहित अमेरिकेचा विकासदर नकारात्मक पातळीवर होता. दुसऱ्या तिमाहीत विकासदर नकारात्मक पातळीवर राहण्याची शक्यता आहे. दोन तिमाहीमध्ये विकासदर नकारात्मक पातळीवर असल्यानंतर मंदी निर्माण होण्याची शक्यता असते.
अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेतील औद्योगिक उत्पादन कमी होऊन बेकारी वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे आता महागाई रोखण्याबरोबरच काही प्रमाणात विकासदाराकडे लक्ष देण्याचे संकेत पावेल यांनी दिल्यानंतर शेअर बाजारात खरेदीचा जोर वाढला. आता फेडरल रिझर्व्हच्या सप्टेंबरमधील पतधारणात फार तर व्याजदरात अर्धा टक्क्याची वाढ होईल आणि त्यानंतर ती कमी होत जाईल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.