चंबळ नदीत 40 प्रवाशांसह बोट बुडाली

5 जणांचा मृत्यू, 10 ते 12 जण बेपत्ता

राजस्थानच्या बुंदी येथील दुर्दैवी घटना

कोटा – राज्यस्थानमधील बुंदी येथे चंबळ नदीत 40 प्रवाशांसह बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 जण बुडाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. यात आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अद्याप 10 ते 12 जण बेपत्ता आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

गोठला कलाच्याजवळ कमलेश्वर धाम जात असताना ही घटना घडली. बुंदी जिल्हयातील चंबळ नदीतून 40 ते 50 प्रवाशांना घेवून ही बोट चालली होती. दरम्यान, ही बोट अचानक उलटली. या बोटीत महिलांसह काही लहान मुले देखील प्रवास करीत होती.

सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने हा अपघात घडल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. या बोटीत 14 मोटरसायकलही होत्या.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 10 जण बेपत्ता आहेत. यादरम्यान, अनेकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्याला सुरुवात झाली.

दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. लोकसभा सचिवालयाने जिल्हा प्रशासनोसोबत संपर्क साधला असून कोटा येथून एसडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहेत. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तातडीने मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.