ट्युनिस – ट्युनिशियाजवळ बोट दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे 17 बंगाली शरणार्थ्यांना जलसमाधी मिळाली आहे. हे शरणार्थी लीबियातून भूमध्य समुद्र ओलांडून इटलीमध्ये निघाले होते. या बोटीतील 380 शरणार्थ्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे, असे ट्युनिशियाच्या रेड क्रेसेंट या मानवाधिकार विषयक संस्थेने म्हटले आहे.
शरणार्थ्यांना घेऊन ही बोट लीबियाच्या वायव्येकडील किनाऱ्यावरील झुवारा येथून इटलीकडे निघाली होती. या बोटीमध्ये लीबिया, सुदान, इरिट्रीया, माली आणि बांगलादेशातील शरणार्थ्यांचा समावेश होता, असेही रेड क्रेसेंटने म्हटले आहे.
अलिकडच्या काळात लीबियातून भूमध्य समुद्रातून इटलीकडे जाण्याच्या प्रयत्नात अनेक शरणार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. सागरी मार्गादरम्यानच्या वातावरणामध्ये सुधारणा झाल्यामुळे लीबिया, ट्युनिशियावरून इटलीला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
आफ्रिका आणि मध्य पूर्वेतल युद्धजन्य परिस्थिती आणि दारिद्रयाला कंटाळून हे शरणार्थी युरोपात स्थलांतर करत असतात.