टोकियो – जपानच्या शिरावरून करोनाचे संकट जाण्याची चिन्हे अद्यापही दिसत नसल्याचे समोर येत असून टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून नव्या करोना रुग्णांची वाढ झाल्याने जपान ऑलिम्पिक संघटना चिंतेत आहे. मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार होती. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा नव्या कार्यक्रमानुसार 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
देशात पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या स्पर्धेच्या आयोजनावर संकट आले आहे. त्यातच गेल्या 3 वर्षांपासून देशात या स्पर्धेसाठी सर्व मैदाने, क्रीडा संकुले तसेच नागरी सुविधा आदींचे नूतनीकरण हाती घेण्यात आले होते. स्पर्धा पुढे गेल्याने हे नूतनीकरण पूर्ण करण्यासाठी वेळ मिळाला असला तरीही आता सरकार व संघटना यांना पुन्हा प्रचंड पैसा खर्च करावा लागणार आहे. या सुविधा पूर्ण कशा करायच्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत एका संस्थेने जनमत चाचणी घेतली होती, यात जवळपास 80 टक्के नागरिकांनी ही स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यातच टोकियो शहरात करोना रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याने स्पर्धेच्या तयारीलाही खीळ बसली आहे.
क्रीडाग्राम तसेच विविध मैदानांच्या नूतनीकरणाचे काम अद्याप सुरू आहे. त्यातच रुग्ण वाढल्याने अनेक शहरांतील लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने या कामातही अडथळे आले आहेत. या स्पर्धेसाठी जपान सरकारनेही ऑलिम्पिक संघटनेला मोठी मदत केली होती, आता पुन्हा आर्थिक सहकार्य करणे अशक्य असल्याचेही संकेत सरकारने दिल्याने संघटनेला अपुऱ्या निधीमुळे विकासकामे बंद करावी लागण्याची शक्यता आहे.
प्रायोजकांनी फिरवली पाठ …
या स्पर्धेचे यजमानपद जपानला मिळाले तेव्हापासून देशातील तसेच परदेशातील बड्या कंपन्यांनी प्रायोजकता देण्याचे जाहीर करत प्राथमिक निधी जपान ऑलिम्पिक संघटनेला दिला होता. स्पर्धा पुढे गेल्याने करार कायम असला तरीही प्रत्यक्ष स्पर्धा होणार हे निश्चित झाले तरच करारातील उर्वरित रक्कम दिली जाणार असल्याचे प्रायोजकांनी स्पष्ट केल्याने सरकार व संघटनेसमोर आर्थिक संकट उभे पाहिले आहे. त्यातच काही सह प्रायोजकांनी तर या स्पर्धेकडे पाठ फिरवण्याचेच चित्र दिसत आहे.