YS Jagan Mohan Reddy – आंध्र प्रदेशात सत्तांतर झाल्यानंतर तेथील राजकीय घटनाक्रम अत्यंत वेगाने बदलतो आहे. राज्यातील सत्ता आता जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेसच्या हातात नसून चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाच्या हातात आहे. नायडू यांचा पक्ष केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्याच कारणामुळे वायएसआर कॉंग्रेसचे दोन राज्यसभा सदस्य मोपीदेवी वेंकटरमण राव आणि बीधा मस्तान राव यांनी राजीनामा दिल्यानंतर या पक्षाचे अजुन किमान सहा खासदार राज्यसभेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्तान आणि वेंकटरमण यांनी अलिकडेच चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. ते लवकरच नायडूंच्या पक्षात दाखल होती असा अंदाज वर्तवला जातो आहे. टीडीपीच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार वेंकटरमण राव यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. तर मस्तान कोणतीही अट न घालता टीडीपीमध्ये सहभागी होण्यास तयार झाले आहेत.
वायएसआरचे आणखी किमान सहा खासदार पक्षाला रामराम करणार असून त्यातील काही जण टीडीपी तर काही जण भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर ११ खासदार निवडून जातात. सध्या या सर्व जागा जगनमोहन रेड्डी यांच्याकडे आहेत. आता या पक्षांतरामुळे नायडूंच्या पक्षाचा राज्यसभेत पुन्हा शिरकाव होणार आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार वायएसआरच्या खासदारांची अशी तक्रार आहे की विविध मुद्द्यांवर जगनमोहन यांची नेमकी काय भूमिका आहे हे त्यांना सांगितलेच जात नाही. त्यामुळे सभागृहात त्यांची गोंधळल्याची स्थिती असते. सभागृहाच्या अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे समर्थन केले. मात्र त्यानंतर ते म्हणजे जगनमोहन इंडिया आघाडीसोबत रमताना दिसत आहेत. सत्तेतून बाहेर असल्यामुळे सभागृहात आपण असंबंध्द ठरलो आहोत अशी खासदारांची भावना झाली आहे.