इथेनॉल निर्मितीला बसणार फटका

साखर कारखान्यांना ऊस उपलब्ध होत नसल्याने उत्पादन घटणार

भवानीनगर- इंधनाची मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण साध्य करण्याकरीता इंधनात इथेनॉल मिसळणे हा एक चांगला पर्याय असल्याने याच्या निर्मितीकडे बहुतांशी सर्वच कारखाने भर देत आहेत. परंतु, यावेळी राज्यभरासह जिल्ह्यात उसाच्या पीकाला मोठा फटका बसल्याने गळीत हंगामच कसाबसा सुरू असल्याने याचा परिणाम इथेनॉल निर्मितीवरही होणार आहे. याचा आर्थिक फटका कारखान्यांना बसू शकतो. सध्या, पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळणे यासह औषध, रसायनं तसेच मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून इथेनॉलला चांगली मागणी आहे. परंतु, उत्पादनातच घट होणार असल्याने इथेनॉलचे दरही वाढतील, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे
राज्यातील सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम या महिन्यांच्या सुरवातीस चालू झाला आहे.

यातील काही कारखान्यांना एफआरपीच्या मुद्यावर गळीताचा परवाना साखर आयुक्तांकडून देण्यात आलेला नाही. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश आहे. त्यातच राज्यासह जिल्ह्यातील ऊस पीकाला अवकाळी तसेच हवामानाच फटका बसल्याने गळीतासाठी ऊस कमी पडत आहे. यामुळे ऊस मिळवण्यासाठी सहकारी तसेच खासगी कारखान्यांत स्पर्धा सुरू झाली आहे. गळीत हंगाम चांगल्यापद्धतीने पार पडला तरच साखर निर्मिती होवून कारखाने फायद्यात राहणार आहेत. याकरीता ऊस मिळवण्याची धडपड सुरू असताना कारखान्यांना उपप्रकल्प सुरू ठेवण्याचेही आव्हान असणार आहे.

वीज निर्मिती तसेच इथेनॉल निर्मिती हे प्रकल्पही यावर अवलंबून असल्याने कारखान्यांना उसासाठी धावपळ करावी लागत आहे. जिल्ह्याचा विचार करता सहकारी बरोबरच खासगी कारखान्यांची संख्या अधिक असल्याने जो कारखाना जादा दर देईल, त्या कारखान्याला ऊस देण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. यातून उसदाराचीही स्पर्धा जिल्ह्यात सुरू झाल्याचे चित्र आहे. कोणत्याही स्थितीत साखर उत्पादनासह अन्य उपप्रकल्प सुरू ठेवणे तसेच इथेनॉल सारख्या जादा पैसे मिळवून देणाऱ्या पदार्थाची निर्मिती करणे यावर कारखाने भर देत आहेत. पेट्रोलियम, रसायन तसेच मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून इथेनॉलची मागणी वाढत आहे. ही गरज उत्तरप्रदेशातील साखर कारखान्यांकडून 40 टक्के पूर्ण केली जाते.

इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्रातील साखर कारखान्यानेही आघाडी असले तरी यामध्ये सातत्य नाही. यामध्ये उसाच्या क्षेत्रात कमी अधिक होणारे प्रमाण मानले जाते. यावेळीही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. इथेनॉल वापरावरून पूर्वी पेट्रोलियम कंपन्यात एकमत होत नव्हते मात्र 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे बंधन घालण्यात आल्यानंतर इथेनॉल खरेदी शिवाय या कंपन्यांपुढे पर्याय उरलेला नाही.

पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी महाराष्ट्रात एका वर्षात 15 कोटी लिटर पेक्षा अधिक इथेनॉलची गरज भासते. राज्याची इथेनॉल उत्पादन क्षमता 90 कोटी लिटरची आहे, साखर कारखान्यांतून निर्माण होणाऱ्या शुद्ध अल्कोहलला (मळी) चांगला भाव मिळत असल्याने साखर कारखान्यांकरिता उत्पन्नाचा हा एक चांगला स्त्रोत आहे. याच कारणातून कारखाने साखर निर्मितीसह इथेनॉल उत्पादनावर भर देतात. परंतु, यावेळी साखर उत्पादनासाठी मुबलक ऊस मिळत नसल्याचे याचा फटका इथेनॉल निर्मितीवरही होणार असल्याचे सांगितले जात आहे.

  • …म्हणून इथेनॉल निर्मिती फायद्याची
    99 टक्क्‌यांपेक्षा अधिक शुद्ध असलेल्या अल्कोहोललाच इथेनॉल म्हंटले जाते. साखर कारखाने सध्या अल्कोहोलचीच विक्री करतात. पेट्रोलियम, मद्य, औषध आणि रसायन उद्योगाची प्रत्येकवर्षांची अल्कोहोलची गरज किमान 50 कोटी लिटर पेक्षा अधिक असून ती वाढत आहे. गेल्यावर्षी इथेनॉलचा दर 38 रूपये होता, यात केंद्र सरकारने वाढ केली असून सध्या 40.85 रूपये लिटर दराने इथेनॉल विक्री कारखान्यांकडून केली जात आहे. या प्रमाणात दर मिळाला तर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती फायदेशीर ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.