नवी दिल्ली : कर्नाटकमधील भाजपा आमदार के एस ईश्वरप्पा एक विधान करून नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ असा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर ईश्वरप्पा यांना धमकीचे पत्र मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पत्रामध्ये त्यांना जर पुन्हा टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ म्हणून उल्लेख केला तर जीभ कापू असे धमकावण्यात आले असून हे पत्र त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले आहे.
कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यदिनी टिपू सुलतान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेले बॅनर लागल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान, ईश्वरप्पा यांनी आपण सर्व मुस्लीम गुंड असल्याचे म्हटलेले नसून, आपण कोणत्याही धमकीला घाबरत नसल्याचेहे म्हटले आहे.
मंगळवारी ईश्वरप्पा यांनी अल्पसंख्यांकांमुळे कर्नाटकतील शिवमोग्गा येथे जातीय तेढ निर्माण झाले असल्याचा आरोप केला. “मला मुस्लीम समाजातील ज्येष्ठांना सांगायचं आहे. सर्वच मुस्लीम गुंड आहेत असे माझे म्हणणे नाही.
मुस्लीम समाजातील ज्येष्ठांनी भुतकाळात शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गुंडगिरीत सहभागी होणाऱ्या तरुणांना त्यांनी मार्गदर्शन करावं असा माझा सल्ला आहे. अन्यथा सरकार यावर कारवाई करेल आणि त्यांना या कारवाईचा सामना करावा लागेल,” असे ईश्वरप्पा म्हणाले आहेत.