बॉलीवूडमध्ये आजपर्यत अनेक खेळाडूंच्या जीवनावर आधारित बायोपिक साकारण्यात आले असून आजही अनेक जणांवर बायोपिक साकारले जात आहेत. आता भारतातील बुद्धिबळातील जादूगर विश्वनाथन आनंद यांच्यावर बायोपिक साकारण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करणार आहेत. बॉलीवूडमध्ये सध्या स्पोर्टस बायोपिक चित्रपटांची खूपच चलती सुरू आहे. एमएस धोनी, एमसी मेरी कॉम, संदीप सिंह आणि मिल्खा सिंह यांच्या बायोपिक साकारल्यानंतर अन्य खेळांडूचेही बायोपिक बनविण्यात येत आहेत.
आता जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारताच्या विश्वनाथन आनंद यांच्यावरही चित्रपट साकारण्यात येत आहे. जागतिक स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत विश्वनाथन आनंद हे दीर्घ काळापासून भारताचे प्रतिनिधीत्व करत आहेत. आतापर्यत पाच वेळा विश्वविजेतेपद मिळविलेल्या विश्वनाथन आनंद यांनीही आपल्या बायोपिकला सहमती दर्शविली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करणार आहे.
यापूर्वी त्यांनी “तनु वेड्स मनु’, “राझणा’ आणि “झिरो’ यासारखे हिट चित्रपट दिलेले आहेत. सध्या ते अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुषसोबत “अतरंगी रे’चे शूटिंग करत आहेत. दरम्यान, या बायोपिकसाठी अद्याप कलाकार निश्चित करण्यात आलेले नाही. परंतु लवकरच याची घोषणा करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे.