शिरवळ – शिरवळ-लोणंद रस्त्यावर पिसाळवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकी चालक जागीच ठार झाला आहे. कुमार उर्फ पप्पू ज्ञानोबा कांबळे (वय 32, रा.बौध्द आळी, शिरवळ, ता. खंडाळा) असे जागीच ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. दरम्यान, संबंधित कारचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी काहीकाळ आशियाई महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिरवळ येथील कुमार कांबळे हा कुटुंबियांसह वीर धरणाकडे फिरायला जात असताना त्यांच्या मागोमाग शिरवळ येथून भादे, ता.खंडाळा गावच्या हद्दीतील वीर धरणाकडे दुचाकी (क्र. एमएच- 11-सीआर-3280) ने फिरायला निघाला होता. यावेळी दुचाकी पिसाळवाडी, ता.खंडाळा गावच्या हद्दीत गणपती मंदिराच्या पुढे भरधाव वेगाने आलेल्या कार (क्र.एमएच-12-एमएल-899) ने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, कारच्या धडकेत दुचाकीचालक कुमार कांबळे हा दुचाकीवरुन उडून कारवर जोरदार आदळला.
यावेळी कारवर आदळल्याने दुचाकीचालक कुमार कांबळे हा गंभीर जखमी झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला कुमार कांबळे याचा आतेभाऊ आदित्य रमेश कांबळे (वय 17, बोपोडी, पुणे) हा गंभीर जखमी झाला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या कुमार कांबळे याला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.यावेळी कुमार कांबळे याचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सिध्दार्थनगर येथील ग्रामस्थांनी शिरवळ पोलीस स्टेशन व रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यावेळी कारचालकाला आमच्या ताब्यात द्या व कठोरात कठोर कारवाई करा असे म्हणत गर्दी केलेल्या ग्रामस्थांनी गोंधळ घालत शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत आशियाई महामार्ग 47 हा काहीकाळ अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाई पोलीस उपविभागीय अधिकारी अजित टिके, शिरवळ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, गिरीश दिघावकर व पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत महामार्गावरुन बाजूला केले. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने ही क्रेनद्वारे शिरवळ पोलीस स्टेशनला आणली असता गर्दीमधील अज्ञाताने कारवर दगडफेक केली. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने सातारा येथील दंगा नियंञण पथक, लोणंद, खंडाळा, शिरवळ, भुईंज, वाई येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.