संगमनेर – दिवसभर मोलमजुरीसाठी गाव सोडून बाहेरगावी जायचे आणि रात्री उशिरा घरी आल्यावर घटकाभराची विश्रांती घ्यायची आणि लागोलग पाण्यासाठी दाही दिशा करत हजार फुटाची खोल दरी मध्यरात्रीच्या सुमारास खाली उतरायची. दरीत खाली उतरुन तेथे हंडाभर पाणी मिळविण्यासाठी भली मोठी रांग लावायची आणि तांब्याने एका झऱ्यातून पाणी उपसत आपली तहान भागवायची, असे चित्र सध्या संगमनेरच्या पठार भागातील हिवरगाव पठारच्या पायरवाडीमध्ये अनुभवण्यास मिळते. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशाच्या विकासाच्या गप्पांचा फड राजकीय नेत्यांनी रंगविला असतांना दुसरीकडे पाण्यासाठी मात्र लोकाचे हाल सुरु आहेत.
सध्या राज्यात आणि देशात भाजपचे सरकार सत्तेवर आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात याच सरकारने गावे टॅंकरमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार मोहीम हाती घेतली. या मोहीमेचे यशापयश समोर येण्यापुर्वीच राजकीय नेत्यांनी याचा फायदा राज्याला मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. एप्रिलमध्ये सुर्यदेव डोक्यावर आग ओतू लागले असतांना दुसरीकडे जमिनीतील पाणीदेखील आटले आहे. त्यामुळे पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ महिलांसोबत कुटूंबियांवर आली. संगमनेरच्या तळेगाव आणि पठार भागाच्या तर पाचवीला दुष्काळ पुजलेला. दुष्काळाच्या झळा सर्वप्रथम या भागाला लागतात. काही ठिकाणी तर वर्षभर पाण्याचे टॅंकर पुरवावे लागते.
दुष्काळात पाणी योजनादेखील माना टाकतात. आणि टॅंकरने पाणी देण्याची वेळ प्रशासनावर येते. लोकसंख्या विचारात घेऊन टॅंकरने पाणी पुरविण्याचा निर्णय प्रशासन घेते आणि टॅंकरने पाणीदेखील देण्याचा प्रयत्न होते. मात्र गळके टॅंकर आणि निर्धारीत ठिकाणी पोहचेपर्यत पाणी पातळी खाली गेलेल्या टॅंकरमधून पाणी मिळणे म्हणजे डोंगर फोडून उंदीर काढण्यासारखा प्रकार. आलेल्या टॅंकरमधून पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड बघायला मिळते. संगमनेरच्या अनेक वाड्यावस्त्यांवर हे चित्र सध्या दिसत असले तरी हिवरगाव पठारच्या दोनशे लोकसंख्येच्या पायरवाडीत धक्कादायक चित्र समोर आले आहे. पाण्याची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी साडेपाचलाच ही वाडी गाठावी लागली आणि धक्कादायक वास्तव समोर आले. उन्हाळ्यात निर्माण झालेल्या दुष्काळामुळे गावातील विहीरीचे पाणी आटलेय.
आता या वाडीत आठवड्यातुन एकदा पाण्याचा टॅंकर येतो. दोनशे लोकवस्तीच्या गावाला आठवडाभर या टॅंकरचे पाणी पुरत नाही. वाडीतील लोक दिवसा मोलमजुरीसाठी बाहेरगावी दूरवर दुसऱ्या तालुक्यात जातात. रात्री उशिराने घरी परतल्यावर त्यांच्यासमोर चिंता असते ती हंडाभर पाण्याची, त्यामुळे काही काळ पाठ टेकविल्यानंतर मध्यरात्री अडीच-तीन वाजता वाडीतील लोक कुटूंबे जागी होतात आणि पाण्यासाठी हजार फुटापेक्षा अंतर असलेली दरी उतरुन खाली येतात. तेथे एका झऱ्यातुन त्यांना पाणी उपसावे लागते. तांब्याच्या साहाय्याने हंडा भरण्यासाठी तास-अर्ध्यातासाचा अवधी जातो. तर पाण्यासाठी लहान मुलांना आपली शाळादेखील बुडवावी लागते. मोठी घरात नसताना या दरीतून पाणी आणावे लागते. मायबाप सरकार निवडणुकीत व्यस्त असतांना लोकांना पाण्याची चिंता भेडसावत आहे.
आम्हाला आठवड्याला टॅंकरने पाणी येते ते चार दिवसही पुरत नाही. पहाटे तीन वाजल्यापासून झऱ्यावर येऊन बसले तेव्हा सकाळी सात वाजता नंबर लागला. अर्धातासाला एक हंडा भरतो.
नर्मदा वामन केदार