जम्मू – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमा तीव्र केल्या आहेत. त्यातून जम्मू विभागात स्वतंत्र घटनांमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. त्यामुळे घातपाताचा मोठा डाव उधळला गेल्याचे मानले जात आहे.
किश्तवाड जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. ते हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत नुकतेच भरती झाले होते. त्यांच्याकडून पिस्तुल, ग्रेनेड जप्त करण्यात आले. पूँच जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दुसरी महत्वाची कारवाई करताना दहशतवाद्यांचा अड्डा उद्धवस्त केला. तिथून दोन एके-47 रायफली, चिनी बनावटीचे पिस्तुल, ग्रेनेड आणि डिटोनेटर्स हस्तगत करण्यात आले.
सुरक्षा दलांच्या कारवाईवेळी संबंधित अड्ड्यावर एकही दहशतवादी आढळला नाही. मात्र, संबंधित परिसरातच काही दहशतवादी दडले असण्याची शक्यता आहे. त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. स्वातंत्र्यदिन जवळ आल्याने जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून घातपात घडवला जाण्याची शक्यता विचारात घेऊन सुरक्षा दले अधिक सतर्क झाली आहेत.