अपघाताची शक्यता; वाहनधारक, प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया, रस्ता खड्डेमुक्त करण्याची मागणी
वाठार स्टेशन – वाठार स्टेशन ते सातारा रस्त्यावर पिंपोडे खुर्द येथील वसना नदीच्या पुलाच्या पूर्वेला असणाऱ्या छोट्या पुलावर मोठे भगदाड पडले आहे. तसेच गावा जवळून जाणाऱ्या वसना नदीच्या पुलावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक असून वाठार स्टेशन पोलिस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही ठिकाणी बॅरिकेट्स लावून रात्री आठनंतर सर्व वाहने पळशी मार्गे अंबवडे फाटा अशी वळवली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाठार स्टेशन ते सातारा रस्ता पूर्ण खड्डेमय झाला असून या तीस किलोमीटर अंतरात मोजता येणार नाहीत एवढे खड्डे आहेत परंतु प्रशासन या रस्त्याची कसलीच दखल घेत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग तर मूग गिळून गप्प आहे.
या खराब रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असतात जीवित हानी होऊ शकते या सर्व गोष्टी माहिती असून सुद्धा या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा प्रशासन जाणून-बुजून डोळे झाक झाक करीत आहेत.
वाठार स्टेशन पोलिसांच्याकडे कर्मचारी संख्या कमी आहे तरीपण वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. स्वप्नील घोंगडे साहेब हे तत्परअसतात. अचानक आलेल्या संकटावेळी तातडीने आपले कर्मचारी तैनात करून वाहतूक सुरळीत करतात. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग कायमस्वरूपी दुर्लक्ष करीत असतात तरी प्रशासनाने सातारा ते वाठार स्टेशन रस्ता खड्डेमुक्त करावा अशी मागणी प्रवासी वाहतूकदार तसेच ग्रामस्थांकडून होत आहे.