मशिगन आणि जॉर्जियामधील केसेस कोर्टाने फेटाळल्या
न्युयॉर्क : अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही चांगलीच रंगली आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात विजयासाठी लढत चुरशीची होताना दिसत आहे. आता बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, मात्र ट्रम्प मतगणनेच्या विरोधात न्यायालयात गेल्याने अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे. दरम्यान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेल्या मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस न्यायालयाने फेटाळल्या आहेत. ट्रम्प यांनी या दोन्ही राज्यांमधील पोस्टल बॅलेट मतगणना थांबवण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
दुसरीकडे जो बायडन यांनी आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी आवाहन केले आहे. अमेरिकेत कायद्याची लढाई लढणे हे फार खर्चिक आहे. यासाठी जवळपास 75 कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. त्यामुळे ट्रम्प न्यायालयात गेल्यानंतर बायडन यांच्या टीमने तात्काळ ‘बायडन फाईट फंड’ स्थापन केला आहे.
जो बायडन यांच्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन या माध्यमातून केले आहे. जॉर्जियामध्ये ट्रंप आणि बायडन यांच्यातील मुकाबला रोमांचक झाला आहे. या ठिकाणी दोन्ही उमेदवारांची वोटिंग टक्केवारी समान झाली आहे. दोघांनाही या ठिकाणी 49.4 टक्के मते मिळाली आहेत.