नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष ध्रुव नारायण यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ध्रुव नारायण यांना छातीत दुखू लागले, तेव्हा त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना सकाळी 6.40 वाजता रुग्णालयात दाखल केले. पण, त्यांना वाचवता आले नाही. डीआरएमएस हॉस्पिटलचे डॉ. मंजुनाथ यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आर ध्रुव नारायण यांचे आज म्हैसूर इथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चामराजनगरमधून ते दोन वेळा खासदार राहिले आहेत. ध्रुव नारायण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.
ध्रुव नारायण हे जुन्या म्हैसूरचे प्रभावी दलित नेते होते. तसेच, ते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे जवळचे मित्र होते. निवडणुकीच्या काळात ते चामराजनगरमधील मोठे नेते मानले जात होते.
ध्रुव नारायण यांनी दोन वेळा खासदार आणि आमदार म्हणूनही काम केलं आहे. यावेळी ते नांजनगुडू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते. दरम्यान, खासदार प्रताप सिंह यांनी ध्रुव नारायण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रताप सिंह यांनी लिहिलंय, ‘देवानं अशा चांगल्या व्यक्तीला हिरावून घेतलं…ओम शांती!’